स्वामींबद्दल

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोटनिवासी
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय''

' शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो।। ' 


श्री स्वामी समर्थ महाराज हे "श्री दत्तगुरू", "श्रीपादवल्लभ""श्री नृसिंहसरस्वती" यांपुढचे दत्तात्रेयाचे चौथे अवतार आहेत.

श्री दत्तावरतारामध्ये त्रिदेव हे तीन गुणांचे म्हणजेच श्री ब्रम्हदेव -रजोगुण, श्री शिव तमॊगुण व श्री विष्णू सत्वगुणांचे प्रतिनिधित्व करतात. तर त्यांच्या मागे उभी असलेली गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते, तर जवळ उभे असलेले चार कुत्रे हे चार वेद (ऋग्वेद, सामवेद, यर्जुवेद व अर्थववेद) यांचे प्रतिनिधित्व करतात. वास्तविक पहाता श्री दत्तगुरू हे निर्गुण निरंकार आहेत. परंतु आपल्या भक्तांकरीता त्यांनी श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपात सगुण अवतार धारण केला. भक्तांचे सर्वतोपरिकल्याण करून त्यांना सांसारिक जीवनातुन मुक्त करणे हा श्री दत्तगुरूंच्या अवतार कार्याचा मुख्य उद्देश्य आहे.
श्री दत्तगुरू                 श्रीपादवल्लभ      श्री नृसिंहसरस्वती           श्री स्वामी समर्थ
 इ.स. १४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की, त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज... 

     आपल्या हातून ह्या महापुरूषाला जखम झाली या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांची माऊली असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. स्वामींची शेगावचे श्री गजानन महाराजांबरोबर तसेच शिर्डीचे श्री साईनाथ महाराजांबरोबर अलौकिक कार्यासाठी भेट झाली होती असा काही ठिकाणी उल्लेख आहे. (स्वामींनी ३०० पेक्षा जास्त सिध्दपुरुष निर्माण केले असे काही जाणकार म्हणतात). त्यानंतर ते पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. 

     श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढा येथे साधारण १८३८ साली प्रगट झाले. अक्कलकोट येथे प्रगट होण्याआधी श्री स्वामी समर्थमहाराजांनी चीन, हिमालय, पुरी, बनारस, हरीद्वार, गिरनार, काठीवाड, कांचीपुरम, रामेश्वर ह्या ठिकाणांनाभेटी दिल्या, नंतर मंगळवेढ्याला जिथे दामाजीपंतानीकार्य केले त्या ठिकाणाला भेट दिली.

इ.स. १८५६-१८५७ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले  त्यांच्या तत्पूर्वीच्या जीवनाबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. अक्कलकोट येथेच १८७८ साली महासमाधी घेतली आणि  अनेकांना कार्यरत करून त्यांचा एक अविष्कार संपविला असे भासवले. परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
 
   अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना दिले आहे.

     श्री स्वामी समर्थ महाराजांचे कार्य अलौकिक होते. त्यांचे विविध जाती धर्मांचे अनेक भक्त होते. परंतु महाराजांना त्यांच्या मनीचा भक्तीभाव विषेश प्रिय होता. कुणाच्या मनात काय चालले आहे हे चटकन महाराज ओळखत. कधी रागावून, कधी प्रेमाने, कधी प्रत्यक्ष दाखले देऊन महाराज अभक्ताला भक्तीमार्गात आणत. अघोरी प्रथा व अंधश्रध्दा महाराजांना पसंत नव्हती.



अक्कलकोट स्वामीं समर्थांचे रुप वर्णन:


अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज

श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर, श्री गुरूलीलामृत व इतर साहित्य वाचल्यावर कळते कि, महाराजांची शरीरयष्टी अत्यंत सुदृढ व धिप्पाड होती. कांती तेज:पुंज तप्त सुवर्णाप्रमाणे होती. त्यांच्या तोंडावर अलौकिक तेज होते. त्यांचा वर्ण गोरा होता, ते अजानबाहू होते. स्वामींची उंची साधारण ६ - ६.५ फूट होती. त्यांचा चेहरा उग्र होता. त्यांच्या कानाच्या पाळ्या विशाल असून ते वयातील किंवा पुरातन पुरुषाप्रमाणे वाटत. त्यांचा शरीर गंध चंदना सारखा होता.  पण जेव्हा ते चालायचे तेव्हा सामान्य माणसांना त्यांच्याबरोबर पळत जावे लागायचे. महाराज नेहमी लंगोटी नेसत असत, त्यांच बरोबर महाराजांची वृत्ती विलक्ष होती. जाणकार सांगतात कि बहुतेक वेळ स्वामी समाधीस्थितीतच असल्याने, अंगावरील वस्त्रांचे भान नसे व त्यामुळे बहुदा ते दिगंबर हि असत. नित्यनियम असे काही नव्हते. दूसऱ्याने स्नान घालणे, जेवण घालणे इत्यादी मात्र करावे लागत असे. तसे महाराज कोठेपण जात तेव्हा बोलतांना हूक्का ओढणे तर चालूच असायचे, पण दर घटकेस त्यांची वृत्ती वेगळी असायची. इतके असून त्यांच्यातील पवित्रता, मांगल्य कधीही भंग पावलेले नव्हते, म्हणून हजारो भक्त आजही स्वामींच्या दर्शनाला श्री क्षेत्र अक्क्लकोट येथे येतात.

अक्कलकोट स्वामींची ओळख पाहिली असता, ती श्री नृसिंह सरस्वती अशा भुमिकेस अनूसरुन आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्रीशैल्य येथे कर्दळी वनात समाधीस्त बसले होते. त्यांच्या समाधीचा कालावधी हा साधारण त: तीनशे वर्षाचा होता. महाराज समाधी अवस्थेत असतांना उध्दव नावाचा लाकूडतोडया त्या जंगलात लाकूड तोडण्यास गेला. लाकूड तोडता-तोडता उध्दवची कुर्‍हाड ही चूकून एका वारुळावर पडली कुर्‍हाड पडल्यामूळे महाराजांची समाधी भंग झाली व त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रगट झाले. ती कुर्‍हाड पडल्यामूळे महाराजांना मांडीला जखम झाली होती महाराजांना झालेल्या जखमेतून रक्त निघत असल्यामुळे उध्दवाने तेथील वन‍औषधीचा लेप महाराजांच्या जखमेला लावून दिला. स्वामींना ज्या ठिकाणी जखम झाली होती, त्याठिकाणी त्या जखमेची खूण पाहिल्याचे काहि भक्तजनांनी पाहिले होते असा उल्लेख आढळतो. त्यानंतर स्वामींनी उध्दवला आशिर्वाद दिला व ते तेथून पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरीता निघाले.


अक्कलकोट संस्थान:
अक्कलकोट हे इ.स. १९४८ पर्यंत राजधानीचे ठिकाण होते. अक्कलकोटचे जहांगीर "फत्तेसिंग भोसले" (पूर्वीचे नाव राणोजी लोखंडे) यास छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १६१२ मध्ये वंशपरंपरेने आपली राजधानी दिली. इ.स. १८४८ मध्ये सातारचे राज्य खालसा झाले. त्यामुळे अक्कलकोट संस्थानाचा सर्व कारभार हा ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली आला होता.

महर्षी विनोद:
श्री स्वामीसमर्थ अक्कलकोट सर्व प्रकारच्या दीक्षा प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देत असत. पण माझ्या मते संकल्पदीक्षा हा त्यांचा प्रमुख दीक्षा-विधी असे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे सर्व सिद्धींचा एक चित्रपटच आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हे साधनासिद्ध नसून केवलसिद्ध होते. त्यांनी सिद्धी मिळवल्या नव्हत्या. पक्षांना आकाश संचार जसा सहज तशा सर्व सिद्धी त्यांना सहजप्राप्त होत्या.
सौजन्य:
श्री स्वामी समर्थ भारत भ्रमण करुन अक्कलकोटला का आले यामागे काहीतरी रुढी संकेत असावा असे वाटते म्हणूनच अक्कलकोट हे आज प्रज्ञाक्षेत्र मानले जाते.
सोलापूर शहरापासून अवघ्या २४ मैलाच्या अंतरावर श्री क्षेत्र अक्कलकोट आहे. अक्कलकोट मध्ये एकून १२८ खेडयांचा तालुक्यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई, मद्रास रेल्वे ब्रॉडगेज मार्गावर अक्कलकोट हे एक मध्यरेल्वेचे छोटेसे स्थानक आहे. रेल्वे स्थानकापासून हे गाव ७ मैल अंतरावर आहे. गावात जाण्यास एस.टी. महामंडळाने सोई करुन दिल्या आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट पासून गाणगापूर, तुळजापूर. पंढरपूर, गुलगर्बा ही तीर्थक्षेत्रे फ़ारच जवळ आहेत. येथूनच १६ मैल अंतरावर गोगांव स्वामी मंदिर (खैराट मार्ग) आहे. बोरी व हरणा या दोन नद्या अक्कलकोट परिसरातून वाहतात या क्षेत्रात आपल्याला ह्या दोन्ही नद्यांचा संगम पहावयास मिळतो. या संगमाजवळ श्री संगमेश्वराचे अतिशय पुरातन मंदिर आहे. मंगरुळ, तडवळ ही तालुक्यातील मोठी गावे आहेत. तसेच मंगरुळ व दुधनी हे गाव विडयाच्या पानासाठी प्रसिध्द आहे. 
सौजन्य (http://www.ambaai.org/mar/god/samarth/ )

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ